GRAMIN SEARCH BANNER

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
68 Views

डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ‘ ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान 1 हजार लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. “लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्यात येतील. प्रत्येक आगाराकडून आपल्या बस गाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील. त्याचबरोबर, डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल, तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

याचबरोबर, ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे केपीएल (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यासारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्यूनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणाली यासारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटीमुळेही इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3485312
Share This Article