GRAMIN SEARCH BANNER

चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड! बचत गट, माविमंसह बेरोजगार संस्थांशी भाडे करार

Gramin Varta
41 Views

मुंबई:  गाव, महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक व महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर ‘नेपियर ग्रास’ आणि बांबूची लागवड करण्यात येणार आहे. ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना तीन वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे.

राज्यातील चारा टंचाईच्या समस्या तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बैठकीला अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यानुसार शासकीय जमिनींसोबतच आता शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही भूधारकाला आपली खासगी जमीन विनाकारण पडीक किंवा रिकामी ठेवता येणार नाही. तिचा योग्य शेती किंवा चारा उत्पादनासाठी वापर करणे बंधनकारक असेल.

राज्यातील दुग्धव्यवसायाला गती देण्यासाठी दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले दूध पाहिजे असेल, तर चांगला चारा मिळणे गरजेचे आहे, हा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे राज्यातील एकही सरकारी महसुली जागा किंवा शेती क्षेत्रातील शासकीय जमीन पडीक राहणार नाही. या जमिनींचा वापर केवळ चारा आणि बांबू लागवडीसाठीच नव्हे, तर रोपवाटिका (नर्सरी), अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि सेंद्रिय खत निर्मिती यांसारख्या पर्यावरणपूरक व रोजगारभिमुख प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.

राज्यातील संपूर्ण सरकारी जमिनींची तातडीने मोजणी करण्यात येणार असून, सर्व शासकीय जमिनींवर ‘शासकीय मालमत्ता’ असल्याचे फलक लावण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

जमिनी भाडेपट्ट्याने देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), गट विकास अधिकारी आणि संबंधित कार्यकारी यंत्रणा यांच्यात एक मजबूत त्रिपक्षीय करार केला जाईल. महसूल विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी या कराराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील.

शहरी व निमशहरी प्राधिकरणांच्या क्षेत्रांतही ही योजना लागू केली जाणार आहे. एमएमआरडीए, पीएमआरडीए, एनएमआरडीए, सिडको आणि इतर सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या अखत्यारीत येणाऱ्या महसूल विभागाच्या सर्व मोकळ्या व पडीक जागा या प्रकल्पासाठी ताब्यात घेऊन वापरल्या जातील.

महिला बचत गट आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे. पडीक जमिनींचा हा हरित कायापालट राज्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देणारा ठरेल. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री.

Total Visitor Counter

3485068
Share This Article