रत्नागिरी: कुवारबाव – साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे गुरुवारी रात्री झालेल्या सुरज राजाराम झोरे (वय २५) या तरुणाच्या खून प्रकरणातील तपासाला आता तीव्र गती आली आहे. या हत्याकांडात प्रत्यक्षदर्शी असलेल्या आणि घटनेनंतर मुंबईत फरार झालेल्या मुख्य संशयित सोहम म्हात्रे याच्या ‘त्या’ मैत्रिणीला रत्नागिरी शहर पोलिसांनी अखेर समन्स बजावून मंगळवारी सकाळी रत्नागिरीत दाखल करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सायंकाळी तिला थेट गुन्ह्याच्या घटनास्थळी नेले आणि तिच्या उपस्थितीत संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.
या खळबळजनक खून प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८, रा. शांतीनगर – रसाळवाडी, रत्नागिरी), अभिषेक देवानंद राठोड (वय २२, रा. आदिनाथ नगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (वय २१, रा. शांतीनगर – रसाळवाडी, रत्नागिरी) या तिघांना आधीच अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यामागील पार्श्वभूमी पाहता, संशयित सोहम म्हात्रे याचे सुरज झोरे याच्याशी एक वर्षापूर्वी आर्थिक व्यवहारातून मोठे भांडण झाले होते. त्यानंतर सुरज हा सोहम म्हात्रे आणि त्याच्या वडिलांना सतत शिवीगाळ करत होता, तसेच सोहमच्या मैत्रिणीलाही त्याच्या विरोधात भडकावत होता. मनातील हाच सगळा राग आणि खदखद ठेवून सोहमने सुरजचा काटा काढण्याचे पक्के ठरवले होते.
याच पूर्ववैमनस्यातून सोहमने सुरजला गुरुवारी रात्री कुवारबाव येथील निर्जन ठिकाणी बोलावून घेतले आणि तो तिथे येताच सोबत आणलेल्या कोयत्याने सुरजवर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या हल्ल्यानंतर संशयित तिघेही दुचाकीवरून फरार झाले, मात्र गंभीर जखमी सुरजने मृत्यूपूर्वी दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबाच्या आधारे पोलिसांनी रात्रीच तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. आता या संपूर्ण घटनेवेळी उपस्थित असलेल्या आणि नंतर मुंबईत पळून गेलेल्या मुख्य साक्षीदार मैत्रिणीचा जबाब व घटनास्थळाचा पंचनामा यामुळे या खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या हाती अत्यंत मजबूत पुरावे लागले आहेत.








