गुहागर: तालुक्यातील मळण येथे एका घराचे बांधकाम सुरू असताना भिंतीवरून खाली पडून एका ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेश पाष्टे (वय ३४, रा. खामशेत पाष्टेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवार, २८ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मळण येथील एका घराचे काम सुरू असताना नरेश पाष्टे हा तेथे लोखंडी अँगलच्या खांबांचे मोजमाप घेण्याचे काम करत होता. या दरम्यान पडवीच्या भिंतीवर उभे राहून माप घेत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो घराशेजारीच असलेल्या एका कोरड्या वहाळामध्ये (ओढ्यात) कोसळला. नरेश खाली पडत असतानाच त्याच्या अंगावर भिंतीचे जड चिरेही कोसळले, ज्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला.
या अपघातानंतर घटनास्थळावरील लोकांनी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे करत आहेत.





