दापोली : तालुक्यात दोन समाजातील मुलांमधील भांडणाचे पडसाद उमटले असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो लोकांच्या जमावाने वाहने अडवून आणि रस्त्यावर टायर जाळत राडा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई उदय केशव टेमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र जमावांमधील एकूण १६ प्रमुख संशयितांसह सुमारे ५०० हून अधिक अज्ञात लोकांवर बेकायदेशीर जमाव जमवून कायदा हातात घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेपासून ते २८ मे च्या पहाटे सव्वाएक वाजेच्या सुमारास हा संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. याप्रकरणी २८ मे रोजी सायंकाळी ४.४२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २७ मे रोजी सायंकाळी हर्णे गोवा किल्ल्यावर मुलांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘मारहाण करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करा’ अशी मागणी करत २७ मे रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास हर्णे बायपास येथील निसर्ग हॉटेलजवळ रमेश खोपटकर, रवींद्र बोडकर, दत्तात्रय शंकर धाडवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या १०० ते १५० लोकांच्या जमावाने बेकायदेशीर गर्दी जमवली. या संतप्त जमावाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या चालू प्रतिबंधात्मक मनाई आदेशाचे थेट उल्लंघन केले. एवढ्यावरच न थांबता जमावाने थेट रस्त्यावर उतरून टायर जाळले आणि महामार्गावरून ये-जा करणाऱ्या गाड्या अडवून प्रवाशांना इच्छापूर्वक अटकाव करत रस्ता रोखून धरला.
हा तणाव एवढ्यावरच शांत झाला नाही, तर याच घटनेच्या निषेधार्थ त्याच रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दापोलीतील मुख्य केळसकर नाका येथे दुसरा मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला. यामध्ये मयुर लहु मोहिते, संदीप राजाराम गायकवाड, राजा पटेल, राकेश प्रवीण भांबेड, सचिन सावंत, संजय सदानंद रहाटे, ओमकार वेल्हाळ, अमित साळवी, बाप लिंगावळे, प्रणव रेळेकर, बाक्कर, अमरीश हेदुकर, राकेश माळी आणि त्यांच्यासोबत आलेल्या तब्बल ३०० ते ३५० लोकांच्या अफाट जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याही ठिकाणी जमावाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली आणि कोणत्याही दिशेने वाहने पुढे सरकू न देता प्रवाशांना बंदी बनवून ठेवले.
शहरातील या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश क्रमांक उचिशा/पोल-२/मनाई आदेश/२०२६ दिनांक २७/०५/२०२६ चे सरळ उल्लंघन केल्याप्रकृती पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. नंबर ११०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम १८९(२), १९०, १२६(२) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१), ३७(३)/१३५ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दापोली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इतर उपद्रवी घटकांचा शोध पोलीस घेत आहेत.





