GRAMIN SEARCH BANNER

हर्णे बंदरासह सागरी किनाऱ्यांवर मासेमारी बोटींच्या शाकारणीची लगबग

Gramin Varta
28 Views

दापोली: समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक नौकांसाठी ६१ दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केली असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध हर्णे बंदर किनाऱ्यावर मासेमारी बोटींच्या शाकारणी आणि रंगरंगोटीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे.

दापोली येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी (अंमलबजावणी अधिकारी) दाभोळ कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेसवी, वाल्मिकिनगर, बाणकोट तसेच दापोली तालुक्यातील केळशी, उटंबर, आडे, पाजपंढरी, हर्णे, बुरोंडी, पंचनदी लखडतरवाडी, दाभोळ, नवसे, भाटी, ओणनवसे आदी भागांतील यांत्रिकी बोटींचा मासेमारी करण्याचा रविवारी ३१ मे हा शेवटचा दिवस असल्याने आता सर्व बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. या बंदी कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण लाभून बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळतो, तसेच खराब हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते, अशी माहिती दाभोळच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दिप्ती साळवी यांनी दिली आहे.


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ मधील तरतुदींनुसार सल्लागार समितीशी विचारविनिमय करून शासन आदेशान्वये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदीचे नियमन करण्यात आले असून सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळल्यास संबंधित नौका, उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच बंदी काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आल्याने मच्छीमारांनी बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर लावून पावसाळ्यासाठी त्या झाकण्याच्या व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

Total Visitor Counter

3447325
Share This Article