GRAMIN SEARCH BANNER

निवे बुद्रुक येथील भीषण अपघातात ‘नमन’ कलाकाराचे निधन

Gramin Varta
2.2k Views

सायलेतील कार्यक्रम उरकून परतताना झाला अपघात, 3 जखमी; विघ्नेशची ‘मावशी’ची भूमिकाच ठरली शेवट!

आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला, खास नमनासाठी मुंबईहून आला होता, नियतीने केला घात

संगमेश्वर : कोकणातील नमन कला क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नमन कलाकार विनायक सपकाळ (वय ३०, रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांचे निवे बुद्रुक येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने नमन कला क्षेत्रासह कोकणातील रसिकांवर शोककळा पसरली आहे.

सायले येथे रविवार 31 मे रोजी नमनाचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना निवे बुद्रुक येथे  व्हॅगनार कार उभ्या डंपरवर जाऊन आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात विनायक याचा जागीच मृत्यू झाला. तर मंगेश पाताडे (45), नंदिनी पाताडे (40, रा. वांद्री संगमेश्वर) हे दोघे पती पत्नी असून मंगेश यांच्या डोक्याला तर पत्नी नंदिनी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर पांचाळ (53, ड्रायव्हर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.

विनायक मुंबईहून खास कार्यक्रमासाठी आलेल्या विनायक यांनी संगमेश्वर तालुक्यातील सायले येथे नमनाचा कार्यक्रम सादर केला होता. कार्यक्रम संपवून परतत असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला. रंगमंचावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार एका क्षणात सर्वांना कायमचा सोडून गेला.

नमनातील ‘मावशी’ ही भूमिका विनायक सपकाळ यांनी अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे साकारली होती. त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि हजरजबाबी संवादांमुळे ते कोकणभर परिचित झाले होते. प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या भूमिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत. त्यांच्या अभिनयात विनोदासोबतच लोककलेबद्दलची निष्ठा आणि जिव्हाळा दिसून येत असे.

सायले येथील कार्यक्रमादरम्यान त्यांनी सादर केलेल्या संवादातील, “मावशीला गवळणी पोचवायलाच बसल्यात…” हे शब्द उपस्थितांच्या स्मरणात अजूनही ताजे आहेत. दुर्दैवाने, हेच शब्द आता कटू सत्य ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. रंगमंचावर उच्चारलेले ते संवाद आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहेत.

विनायक यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नमन कला क्षेत्रातील कलाकार, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

कोकणातील लोककलेसाठी झटणारा एक गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असून, त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याच्या भावना कलाकारांमधून व्यक्त होत आहेत. विनायक सपकाळ यांची रंगभूमीवरील आठवण आणि त्यांनी साकारलेली ‘मावशी’ची भूमिका रसिकांच्या मनात कायम जिवंत राहणार आहे.

Total Visitor Counter

3447211
Share This Article