संगमेश्वर: देवरूख ते रत्नागिरी रस्त्यावरील निवे बुद्रुक सरोदेवाडी येथे पहाटेच्या सुमारास कार आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, यामध्ये कारमधील एका ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल कार चालकाविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कार चालक चंद्रशेखर शिवराम पांचाळ (वय ५३, रा. सायले पांचाळ, संगमेश्वर) हे आपल्या ताब्यातील वॅगनर कार (क्र. एम.एच. ०२ जे.पी. ९४९३) घेऊन सायले येथून निवळी-रत्नागिरीच्या दिशेने जाण्यास निघाले होते. या कारमध्ये मंगेश महादेव पाताडे, नंदिनी मंगेश पाताडे आणि विनय केशव संकपाल हे प्रवासी प्रवास करत होते. पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास ही कार देवरूख ते रत्नागिरी रस्त्यावरील मौजे निवे बुद्रुक सरोदेवाडी येथे आली असता, चालक चंद्रशेखर पांचाळ यांना अचानक झोपेची डुलकी आली. त्यामुळे वेगात असलेली कार रस्त्याच्या उजव्या बाजूला कडेला उभ्या असलेल्या डंपरवर (क्र. एम.एच. ०८ जी. १५५९) मागील डाव्या बाजूच्या चाकाजवळ जोरात आदळली.
हा अपघात एवढा भीषण होता की, कारमध्ये चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेले प्रवासी विनायक केशव सकपाल (वय ३४, रा. कदमवाडी बावडी नं. ०३, मालाड ईस्ट, मुंबई) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील मागे बसलेले प्रवासी मंगेश महादेव पाताडे (वय ४६) यांच्या डोक्याला व मानेला दुखापत झाली असून, नंदिनी मंगेश पाताडे (वय ४२, दोघे रा. वांद्री, रत्नागिरी) यांचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. या अपघातात कार चालक चंद्रशेखर पांचाळ यांच्याही डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे.
या अपघातप्रकरणी डंपर चालक व मालक प्रशांत सुरेश रसाळ (वय ४४, रा. निवे बु. सरोदेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलिसांनी १ जून रोजी दुपारी १२.४९ वाजता कार चालक चंद्रशेखर शिवराम पांचाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ (पूर्वीचे भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम ३०४(अ), ३३७, ३३८, २७९) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






