GRAMIN SEARCH BANNER

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शौर्य, इतिहास, संस्कृती अन् भक्तीचा जागर; रायगडावर ५, ६ जूनला रंगणार लोकोत्सव

Gramin Varta
42 Views

महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर ५ आणि ६ जूनला भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागर शौर्य भक्तीचा’ या संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय सोहळ्यात ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, राज्यभरातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, रायगडचे उपाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी, ५ जूनला दुपारी ३:३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मृतिस्थळ येथे अभिवादनाने होईल. दुपारी ४ वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत होईल. त्यानंतर रायगड चढाई सुरू होईल. रायगडावर आगमनानंतर दुपारी ४:१५ वाजता नगारखान्यात स्वागत समारंभ, सायंकाळी ४:३० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते धार तलवार पीठ तसेच ‘युद्धकला महाराष्ट्राची’ या उपक्रमाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशे, लेझीम आणि वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदंगाचा गजर होईल. रात्री ८ वाजता राजसदर येथे ‘जागर शिवशौर्याचा, स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, रात्री ९ वाजता शिरकाई देवी मंदिरात पारंपरिक गोंधळ होणार आहे. रात्री ९:३० वाजता जगदीश्वर मंदिर येथे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजनाचा कार्यक्रम सादर होईल.

शनिवारी राज्याभिषेक दिनाचा मुख्य कार्यक्रम

शनिवारी, ६ जूनला राज्याभिषेक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी सात वाजता नगारखान्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहणाने प्रारंभ होईल. सकाळी ७:३० वाजता राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम व ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन होईल.

सकाळी १० वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या उत्सवमूर्तीचा अभिषेक करण्यात येईल.
३. सकाळी ११ वाजता शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन दुपारी १२ वाजता पालखी जगदीश्वर मंदिरात पोहोचेल. त्यानंतर दुपारी १२:१५ वाजता वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी १२:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना सामूहिक अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.

Total Visitor Counter

3483721
Share This Article