लांजा: देवरुख-लांजा एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत बस चालवण्याच्या आणि थांबवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एसटी वाहकाला आईवरून अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना लांजा एसटी बसस्थानकात घडली आहे. संशयिताने वाहकाच्या शर्टचा खिसा फाडून नुकसान केले, तसेच वाहक आणि चालकाला ‘चिरून टाकेन’ अशी जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केले. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संशयित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल लक्ष्मण खानविलकर (वय ३९, रा. दत्तनगर देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी या संदर्भात लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते राज्य परिवहन मंडळात (एसटी) वाहक (बॅज नं. ७१८२१) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय तुकाराम खाके (वय ३०, रा. पळू खाकेवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी दुपारी राहुल खानविलकर हे देवरुख-लांजा एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २३१६ वर वाहक म्हणून कर्तव्यावर होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही बस प्रवाशांनी गच्च भरलेली असताना लांजा एसटी बसस्थानकातून सुटली. बस सुरू होताच बसमधील प्रवासी अक्षय खाके याने ‘माझी आई खाली राहिली आहे, बस थांबवा’ असे मोठ्याने ओरडून सांगितले. वाहक खानविलकर यांनी तत्परता दाखवत बस चालक जितेंद्र माईन यांना बस थांबविण्यास सांगितले. त्यानुसार बस चालकाने काही अंतरावर बस थांबवली.
बस थांबल्यानंतर संशयित अक्षय खाके याने वाहक खानविलकर यांच्याजवळ जाऊन ‘तुम्हाला एसटी बस थांबवता येत नाही का?’ असे म्हणून आयडीयल हुज्जत घातली आणि त्यांना आईवरून अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर तो बसमधून खाली उतरला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला. वाहक खानविलकर यांनी संयम बाळगत ‘तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो कंट्रोलरकडे जाऊन बोला’ असे सांगितले. याचा तीव्र राग आल्याने संशयित अक्षय खाके याने खानविलकर यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या शर्टची कॉलर पकडून ओढली. या झटापटीत त्याने वाहकाच्या शर्टचा खिसा ओढून फाडत नुकसान केले. तसेच वाहक खानविलकर आणि चालक जितेंद्र माईन यांच्याकडे पाहून ‘तुम्हाला चिरून टाकेन’ अशी जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर वाहक राहुल खानविलकर यांनी लांजा पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २ जून रोजी रात्री ७.५९ वाजण्याच्या सुमारास लांजा पोलिसांनी संशयित अक्षय खाके याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी हमला करणे, फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, मारहाण, धमकी आणि नुकसान करणे याशी संबंधित कलम १३२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३२४(२) (पूर्वीचे आयपीसी ३५३, ३२३, ३५२, ५०४, ५०६, ४२७) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

