GRAMIN SEARCH BANNER

बँक अधिकारी असल्याचे सांगून रत्नागिरीतील व्यक्तीला २ लाख १७ हजारांचा गंडा

Gramin Varta
6 Views

रत्नागिरी: बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे भासवून, बँक खाते बंद होण्याची भीती दाखवत रत्नागिरी शहरातील एका ५१ वर्षीय व्यक्तीची तब्बल २ लाख १७ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश अर्जन सावंत (वय ५१, व्यवसाय-नोकरी, रा. आयडियल हायस्कूलसमोर, विकास क्वॉर्टर, रत्नागिरी, मूळ रा. पाली बौद्धवाडी, रत्नागिरी) यांनी या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात राहुल अगरवाल नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजन्याच्या सुमारास घडली. फिर्यादी राजेश सावंत हे आयडियल हायस्कूलसमोरील विकास क्वॉर्टर येथील आपल्या घरी असताना, त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपले नाव राहुल अगरवाल असल्याचे सांगितले आणि आपण बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचे बँक खाते बंद होणार आहे, अशी भीती त्याने सावंत यांना घातली.

त्यानंतर संशयित आरोपीने सावंत यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवली आणि त्या लिंकवर जाऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकण्यास सांगितले. बँक खाते सुरू ठेवण्याच्या घाईत सावंत यांनी समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्या लिंकवर प्रक्रिया केली. त्यानंतर सायबर भामट्याने सावंत यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण २ लाख १७ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर वळवून घेत त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सावंत यांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी २ जून २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपी राहुल अगरवाल विरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) (पूर्वीचे आयपीसी ४२०) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485068
Share This Article