GRAMIN SEARCH BANNER

आंबेनळी दुर्घटनेनंतर वास्तव समोर; रायगडमध्ये अपघातांचे भयावह चित्र

Gramin Varta
221 Views

रायगड : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, गेल्या चार महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीत २५४ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये ३०५ जण जखमी झाले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ वाहन सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यातील विविध महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर वाढती वाहनसंख्या, भरधाव वेग, धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरावस्था तसेच वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सर्वाधिक ५१ अपघातांची नोंद झाली असून, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंतर्गत राज्य मार्गांवर ४६ अपघातांत १९ जणांचा बळी गेला आहे.

अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रमुख चौकांमध्ये तपासणी मोहीम, वाहनचालकांचे समुपदेशन, जनजागृती फलक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, या उपाययोजनांनंतरही अपघातांची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, महामार्गांची अपुरी माहिती असताना वेगाने वाहन चालविणे, रस्त्यालगत इंडिकेटर न लावता वाहने उभी करणे, खड्डे चुकविताना नियंत्रण सुटणे, अचानक लेन बदलणे, मद्यपान करून वाहन चालविणे आणि धोकादायक वळणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

रायगडमधील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची तसेच वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3483721
Share This Article