GRAMIN SEARCH BANNER

कुरधुंड्यात पावसाचा तडाखा; वीज वाहिनीवर झाड कोसळून गाव अंधारात, महावितरणचे कर्मचारी तत्काळ दाखल

Gramin Varta
39 Views

संगमेश्वर : तालुक्यात शनिवारी दुपारी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुरधुंडा परिसर हादरून गेला. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात मोठी झाडे थेट वीज वाहिनीवर कोसळल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुसाट वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या. वीज वाहिन्या तुटल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने महावितरणशी संपर्क साधल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मुसळधार पाऊस आणि अंधारातही जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, वारंवार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि ढासळलेल्या यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3372928
Share This Article