चिपळूण ते पुणे प्रवास करताना घडली घटना
खेड : चिपळूण येथून पुण्याच्या दिशेने मुलासमवेत कारने प्रवास करणारे संदेश विश्राम हाडवळे (४७, रा. चिपळूण) हे रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटाजवळ लघूशंकेसाठी उतरले असता अंधारामुळे अंदाज न आल्याने थेट दरीत कोसळले.
पोलिसांसह सह्याद्री बचाव पथकाच्या टीमच्या पथकाने तातडीने बचावकार्य हाती घेत अवघ्या ४५ मिनिटातच सुखरुप बाहेर काढले. या अपघातात ते जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकाराने साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.
ते मुलासमवेत कारने चिपळूणहून पुण्याच्या दिशेने जात होते. ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ आले असता लघूशंका झाल्याने कार रस्त्याकडेला उभी केली. रात्रीची वेळ असल्याने सर्वत्र अंधार होता. त्यात दरीची खोलीही खूप होती. या दरीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते थेट दरीत कोसळले. दरम्यान, वडील अचानक नजरेआड झाल्याने अन् त्याचवेळात दरीतून आवाज आल्याने मुलाची घाबरगुंडी उडाली. त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना देताच यंत्रणेसह बचावपथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पहाटेची वेळ, घाटातील दाट अंधार अन् खोल दरी यामुळे बचावकार्य कठीण बनले होते. मात्र, तरीदेखील रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी धाडसाने दरीत उतरून शोधमोहीम हाती घेत अवघ्या ४५ मिनिटातच जखमी अवस्थेत त्यांना बाहेर काढले.






