GRAMIN SEARCH BANNER

दापोली : गव्हे येथे झोपेत असताना सर्पदंशामुळे विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
327 Views

दापोली :  तालुक्यातील गव्हे येथे शनिवारी मध्यरात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आपल्या घरात नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत झोपलेल्या ४५ वर्षीय दीप्ती जितेंद्र काजरेकर या उच्चशिक्षित महिलेचा विषारी सर्पदंशामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे काजरेकर कुटुंबातील दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले असून, संपूर्ण गव्हे परिसरासह रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी हे माहेर असलेल्या दीप्ती काजरेकर या केवळ गृहिणी नसून उच्चशिक्षित व सुविद्य महिला होत्या. घराशेजारीच दुकान चालवण्यासोबतच त्यांना लोकरीच्या हस्तकलेची उत्तम आवड होती. त्यांनी विणलेली सुंदर तोरणे परिसरात विशेष कौतुकाचा विषय असायची.

शनिवारी ६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना दीप्ती यांना अचानक विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवावे लागले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, परंतु तोपर्यंत विष शरीरात वेगाने भिनल्याने त्यांच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर शनिवारी पहाटे साडेपाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले, सासू-सासरे आणि दीर असा मोठा परिवार असून, या दुर्दैवी प्रसंगामुळे काजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी सकाळी साडेआठ वाजता काजरेकर यांच्या घरी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, तिथे एक विषारी ‘नाग’ लपून बसलेला आढळला. सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने या नागाला पकडून सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती दीपक भिकू बेनेरे यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी या घटनेची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद केली आहे. दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्री. नलावडे या दुर्घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3483537
Share This Article