GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणची सुकन्या तन्वी रेडीजला जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक

Gramin Varta
342 Views

चिपळूण : गुजरात मधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत (वर्ल्ड चॅम्पियनशिप) चिपळूण तालुक्यातील लोटेमाळ गावची रहिवासी आणि रेडीज परिवाराची सुकन्या कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. ४ ते ८ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील विविध देशांतील अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व जागतिक स्पर्धकांवर मात करत तन्वीने आपल्या उत्कृष्ट योगकौशल्य, शारीरिक संतुलन, अभूतपूर्व लवचिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर अव्वल स्थान पटकावले. तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे जागतिक मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला असून सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारी तन्वी रेडीज सध्या चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तन्वीने हे घवघवीत यश मिळवण्यासाठी पाग व्यायामशाळा, चिपळूण येथे खडतर सराव केला असून तिला प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कुशल प्रशिक्षण लाभले आहे. रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिस्तीच्या बळावरच तन्वीने यापूर्वी राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे लोटेमाळ गाव, रत्नागिरी जिल्हा, डीबीजे महाविद्यालय आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तन्वीच्या या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे कोकणातील इतर युवा खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यासाठी एक नवी प्रेरणा मिळाली आहे.

Total Visitor Counter

3483539
Share This Article