वाढत्या उष्म्यामुळे रत्नागिरीतील जिल्हा परिषद शाळा आजपासून सकाळच्या सत्रात; पाऊस येईपर्यंत वेळेत बदल

Gramin Varta
689 Views

रत्नागिरी: जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला असून, या वाढत्या तापमानाने नागरिकांसह विद्यार्थी कमालीचे हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून म्हणजेच १९ जूनपासून सकाळी भरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पावसाचे आगमन झाल्यास पुन्हा पूर्वीच्या वेळेनुसार शाळा भरतील, असा ठराव या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली.

सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अगदी उन्हाळ्यासारखे तापमान झाले असून, या उष्म्यामुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. त्यामुळे शाळा सकाळच्या वेळेत घ्याव्यात, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि अखेर जिल्हा परिषद शाळा सकाळी घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना तातडीने आदेश पाठवण्यात येणार असून आजपासूनच या बदललेल्या वेळेची अंमलबजावणी सुरू होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *