गणपतीपुळे / वैभव पवार : प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी समुद्र दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. प्रेम दीपक आदमाने (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली. उर्वरित चार पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील १९ जणांचा पर्यटन गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या काही तरुणांना पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून जाऊ लागले. यामध्ये पाच जण समुद्रात बेपत्ता झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, जीवरक्षक आणि होमगार्ड जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र समुद्रातील वेगवान प्रवाहामुळे शोध आणि बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तरीही प्रशासनाकडून कस्टम विभाग, मच्छीमारांच्या बोटी तसेच विविध यंत्रणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश होता. यापैकी प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडला असून उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच शोधमोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
दरम्यान, प्रेम आदमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनाने पर्यटकांना समुद्रातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात न जाण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
गणपतीपुळे समुद्र दुर्घटना : बेपत्ता पाचजणांपैकी एकाचा मृतदेह सापडला
Leave a Comment
