भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश बनेची ‘सुवर्ण हॅट्ट्रिक’; वयाच्या पाचव्या वर्षी नोंदवला होता गिनिज बुकमध्ये विक्रम

Gramin Varta
205 Views

देवरुख: रांची येथील १२ व्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या १० वर्षीय रेयांश पराग बने याने ऐतिहासिक कामगिरी करत तीन सुवर्णपदके आपल्या नावावर केली आहेत. झारखंडची राजधानी रांचीमध्ये १६ ते २० जून या कालावधीत पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रेयांशने रोल लॅप, १०० मीटर आणि ५०० मीटर अशा तिन्ही प्रकारांत अव्वल स्थान पटकावत सुवर्ण हॅट्ट्रिक साधली आहे. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केवळ दोन खेळाडूंमध्ये रेयांशचा समावेश होता. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे क्रीडा वर्तुळातून त्याचे कौतुक होत असून, झारखंडच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याचा विशेष गौरव केला आहे.

मूळचा देवरुखचा असलेला आणि सध्या नवी मुंबईतील ऐरोली येथील युरो स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणारा रेयांश हा बालपणापासूनच स्केटिंगमध्ये अत्यंत कुशल आहे. अवघ्या पाचव्या वर्षी सलग ९६ तास स्केटिंग करण्याचा जागतिक विक्रम त्याने प्रस्थापित केला होता, ज्याची नोंद ‘वर्ल्ड गिनिज बुक’मध्ये झाली आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने म्हैसूर, केरळ, कलकत्ता आणि विशाखापट्टणमसह विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये ४४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली आहेत.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी रेयांश रांचीमध्ये सुवर्णपदकासाठी शर्यत जिंकत होता, त्याच दिवशी त्याच्या शाळेतील विद्यार्थी सिनेटच्या निवडणुका पार पडल्या. रेयांश मैदानात असतानाही त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याचा प्रचार केला आणि प्रचंड बहुमताने त्याला पाचवीच्या ज्युनियर सिनेट गटाचा कॅप्टन म्हणून निवडून दिले. क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण यश आणि शालेय निवडणुकीतील विजय अशा दुहेरी कामगिरीमुळे रेयांशचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. देवरुख-संगमेश्वरचे माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू आणि उद्योजक पराग बने यांचा मुलगा असलेल्या रेयांशच्या या यशाने रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली असून, तो भविष्यात ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827919
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *