डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रमोद जठार यांच्या कारवाई करण्याची लांजा तालुका बौद्ध समाजाची मागणी

Gramin Varta
190 Views

लांजा/ फरहान पाटणकर: भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबाबत गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लांजा तालुका बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आमदार प्रमोद जठार यांनी अलीकडेच रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० संदर्भात जे नेहरूंना जमले नाही, जे संविधानकर्त्यांना जमले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले, असे वक्तव्य केल्याची चित्रफीत विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाली आहे. अशा प्रकारचे विधान भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेचे कार्य, त्यातील तरतुदी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाबाबत समाजामध्ये गैरसमज, संभ्रम आणि चुकीची धारणा निर्माण करणारे ठरू शकते. लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीनेही अशा प्रकारची विधाने हितावह नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे संबंधित व्हिडीओ क्लिपची सत्यता, त्यामागील संदर्भ व उद्देश तसेच त्याचा समाजमनावर होणारा परिणाम यांची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीअंती योग्य ती कार्यवाही करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तर निवेदन सादर केल्यानंतर उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणाबाजी केली. तसेच आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली.

दरम्यान, निवेदन देताना अनिरुद्ध कांबळे, श्रीकांत कांबळे, प्रभाकर कांबळे, गौतम कांबळे, लहू कांबळे, एन.बी.कदम, भिकाजी कांबळे, भिकाजी धनावडे, संतोष जाधव, रामचंद्र कांबळे यांच्यासह शेकडो बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *