‘स्वच्छ भारत’चा फक्त गाजावाजा?; संगमेश्वर राजवाडी ब्राह्मणवाडी शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थींना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ

Gramin Varta
259 Views

स्टीलच्या टाकीतून पाणी नेण्याची वेळ, शिक्षण विभागाचे डोळेझाक!

संगमेश्वर : तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, हे स्वच्छतागृह कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजनांचा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील प्रगतशील शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असतानाही गेल्या तब्बल तीन वर्षांपासून स्वच्छतागृह दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच आहे. स्वच्छतागृह पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.

या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बंड्या लिंगायत यांनी कडवई प्रभाग बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. मात्र, बैठकीतील आदेश कागदावरच राहिल्याचे चित्र असून, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.

“डिजिटल शाळांच्या घोषणा केल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांना मूलभूत स्वच्छतागृहाची सुविधा देता येत नसेल, तर ही शिक्षण व्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” असा संतप्त आरोप सामाजिक कार्यकर्ते बंड्या लिंगायत यांनी केला आहे.

एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ आणि पालक उपस्थित करत आहेत. निष्पाप विद्यार्थ्यांना सुरक्षित स्वच्छतागृहाची सुविधा कधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, “आधी सुविधा द्या, मगच शाळा भरवा” अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.

Total Visitors :
4577046
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *