खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने शेतकरी संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Gramin Varta
100 Views

खंडाळा/अमित कांबळे: खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच स्थानिक शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी संवाद मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती मिळावी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याची आखणी केली होती. मेळाव्यात तज्ज्ञांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

मेळाव्यात उपकृषी अधिकारी प्रदीप भुवड यांनी फळबाग लागवड योजनेंतर्गत आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि फणस लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, पॅक हाउस, रायपनिंग चेंबर, आंबा पुनरुज्जीवन, कृषी प्रक्रिया आणि गटशेती महाविस्तार यांसारख्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. कृषी मंडळ अधिकारी विकास मेढे आणि वर्षा नवलकर यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाची माहिती दिली.

कृषी अधिकाऱ्यांनी मृदा परीक्षण, पीक विमा आणि ठिबक सिंचन अनुदानाबाबत तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आणि प्रश्नांवर थेट चर्चा केली असून, तज्ज्ञांकडून त्याचे समाधानकारक निरसन करण्यात आले. आर्थिक व तांत्रिक सहाय्य मिळवून देणाऱ्या योजनांच्या अर्जांची प्रक्रियाही यावेळी समजावून सांगण्यात आली. मेळाव्यात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. येणाऱ्या काळात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :
4556198
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *