दापोली : आषाढी एकादशीनिमित्त सार्वजनिक सभागृहाची साफसफाई सुरू असताना विजेचा धक्का लागून ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आडे-कोळीवाडा येथे घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून उत्सवावर दुःखाची छाया पसरली आहे.
मृत महिलेचे नाव पुष्पा जगदीश नांदगावकर (वय ३८, रा. आडे-कोळीवाडा, ता. दापोली) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोंडेकर मंडळाच्या सार्वजनिक सभागृहात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साफसफाईचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी पुष्पा नांदगावकर या इतर महिलांसह साफसफाई करत होत्या. यावेळी सभागृहाच्या गॅलरीत त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी जवळून गेलेल्या मुख्य वीजवाहिनीच्या तारेला त्यांचा हात लागल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना आंजर्ले येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून दापोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पुष्पा नांदगावकर यांच्या पश्चात पती आणि दहावीत शिक्षण घेणारी १५ वर्षीय मुलगी असा परिवार आहे. आईच्या अकाली निधनाने मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आषाढी एकादशीच्या उत्सवाच्या तयारीदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
दापोली : आषाढी एकादशीनिमित्त साफसफाई करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
Leave a Comment





