दापोलीत नव्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला; रहिवाशांच्या जीवाला धोका

Gramin Varta
144 Views

दापोली : शहरातील फडके दवाखाना गल्ली परिसरातील फॅमिली माळ येथे नव्याने बांधलेली संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही भिंत याच २०२६ मध्ये बांधण्यात आली होती, मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिचे मोठे नुकसान होऊन एक भाग पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. भिंत कोसळल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित भिंतीलाही मोठ्या भेगा गेल्या असल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

​या भिंतीला लागूनच काही घरे असल्याने तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नशिबाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु पावसामुळे माती खचत असल्याने धोका अधिक गंभीर बनला आहे. घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

​नव्याने बांधलेले काम अवघ्या काही महिन्यांतच कोसळल्यामुळे या बांधकामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सततचा पाऊस हे कारण असले तरी, इतक्या लवकर भिंत कोसळणे हे प्रशासकीय कामातील त्रुटी दर्शवते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि उर्वरित धोकादायक भाग तातडीने हटवून सुरक्षित संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Total Visitors :
4575623
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *