रत्नागिरी: कोकणात अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या धाविक या पक्ष्याचे रत्नागिरी शहरातील चंपक मैदानावर २१ जुलै रोजी पक्षी निरीक्षक प्रसाद गोखले यांना दर्शन झाले आहे. कोकणातील या प्रजातीच्या अत्यल्प नोंदींच्या पार्श्वभूमीवर हे दर्शन पक्षी अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यापूर्वीही रत्नागिरी शहरातील याच चंपक मैदानावरून दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी झाल्या असून, त्यामध्ये तणमोर पक्ष्याच्या नोंदीचाही समावेश आहे.
धाविक हा भारतातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण जमिनीवर धावणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे.
उडण्यापेक्षा जमिनीवर अतिशय वेगाने धावत कीटकांची शिकार करणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. वालुकामय तपकिरी शरीर, पांढरे पोट, डोक्यावरील काळा मुकुट, डोळ्यांवरून जाणारी पांढरी पट्टी आणि लांब पाय यांमुळे हा पक्षी सहज ओळखता येतो. महाराष्ट्रात धाविकाचा मुख्य अधिवास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरडी माळराने, उघडी गवताळ क्षेत्रे, पडीक शेती आणि दगडी पठारे हा आहे. मात्र, दाट जंगले आणि अधिक पर्जन्यमानामुळे कोकण हा या पक्ष्याचा नियमित अधिवास मानला जात नाही. त्यामुळे कोकणात दिसणारी प्रत्येक नोंद विशेष महत्त्वाची ठरते.
उपलब्ध निरीक्षणांनुसार, कोकणात यापूर्वी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत धाविकाच्या काही विखुरलेल्या नोंदी झाल्या आहेत. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला परिसर, दोडामार्ग तालुक्यातील माळराने, रत्नागिरी जिल्ह्यातील काही पठारी भाग आणि रायगडमधील उघड्या गवताळ प्रदेशांत हा पक्षी अधूनमधून दिसल्याची नोंद आहे. तथापि, या नोंदी नियमित अधिवास दर्शविणाऱ्या नसून अपवादात्मक किंवा स्थानिक भ्रमंती करणाऱ्या पक्ष्यांच्या स्वरूपातील मानल्या जातात.
रत्नागिरीतील चंपक मैदानावरून पक्षीनिरीक्षक प्रसाद गोखले यांनी केलेली ताजी नोंद कोकणातील उघडी माळराने आणि गवताळ परिसंस्थांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणारी आहे. शहरांमधील अशा मोकळ्या जागा अनेक स्थलांतरित तसेच दुर्मिळ पक्ष्यांसाठी तात्पुरता अधिवास उपलब्ध करून देतात.
त्यामुळे अशा अधिवासांचे संवर्धन आवश्यक असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे. मराठवाड्यातील माळरानांचे शेती किंवा विकासकामांसाठी झालेले रूपांतर, अतिचराई आणि अधिवासाचा ऱ्हास यांसारख्या कारणांमुळे गवताळ पक्ष्यांच्या अधिवासावर दबाव वाढत आहे. त्यामुळे कोकणातील अशा प्रत्येक नोंदी गवताळ पक्ष्यांचे भविष्यातील वितरण, अधिवासातील बदल आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.






