चिपळूण : तालुक्यातील पेढांबे गावचे सुपुत्र तथा मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (MRAI) चे कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे यांनी जपानची राजधानी टोकियो येथे आयोजित करण्यात येणाऱ्या IBS 2026 (International Business Summit) आणि एमआरएआय रोडशोच्या नियोजन व समन्वयात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणासह देशाच्या पुनर्वापर उद्योगालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळत असल्याचे मानले जात आहे.
या परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जपानमधील भारतीय दूतावासाच्या आर्थिक व वाणिज्य मंत्री देबजानी चक्रवर्ती यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत एमआरएआयचे सचिव जनरल अमर सिंह, संचालक बी. के. सोनी आणि कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे सहभागी झाले होते.
बैठकीत भारतातील पुनर्वापर उद्योगाची वाढ, परिपत्रक अर्थव्यवस्था (Circular Economy), शाश्वत विकास, संसाधनांची सुरक्षितता आणि भविष्यातील औद्योगिक संधी यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी एमआरएआयच्या माध्यमातून धातू, प्लास्टिक, कागद, ई-कचरा, बॅटरी, टायर, वस्त्रोद्योगातील कचरा, वापरलेले तेल, कालबाह्य वाहने तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
IBS 2026 परिषद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध देशांतील उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते, जागतिक दर्जाचे वक्ते आणि गुंतवणूकदार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे समन्वय कार्य प्रमोद शिंदे यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे. पुनर्वापर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, भारतासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या सुरक्षिततेस चालना देणे आणि जागतिक संवाद अधिक बळकट करणे, या दृष्टीने त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे.
एमआरएआयच्या कार्याचा गौरव करत आर्थिक व वाणिज्य मंत्री देबजानी चक्रवर्ती यांनी रोडशोसाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच भारत आणि जपान यांच्यात पुनर्वापर, संसाधन पुनर्प्राप्ती, हरित गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि परिपत्रक अर्थव्यवस्था या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
टोकियो येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणारी IBS 2026 परिषद भारत-जपान उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनामध्ये पेढांबे गावचे सुपुत्र प्रमोद शिंदे यांनी निभावलेली भूमिका संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
टोकियोतील IBS 2026 परिषदेत चिपळूणच्या प्रमोद शिंदे यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Leave a Comment






