रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

Gramin Varta
53 Views

कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

मुंबई: कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत  कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कृषीमंत्री  दत्तात्रय भरणे बोलत होते. बैठकीला राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलसचिव डॉ.संजय भावे, उपसिचव प्रतिभा पाटील यासह कृषी विभागाचे अधिकारी उप सचिव उपस्थित होते.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, वाकवली येथे मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर कृषी शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण क्षेत्र, संशोधनासाठी उपलब्ध प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि लागवडीयोग्य जमीन उपलब्ध असल्याने या ठिकाणी पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधनाला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही गती मिळणार आहे.

- Advertisement -

पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल – राज्यमंत्री योगेश कदम

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी वाकवली येथील पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर भागात जावे लागणार नाही. संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Total Visitors :
4645777
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *