युवा महोत्सवात लांजा महाविद्यालयाची दमदार कामगिरी

Gramin Varta
83 Views

विविध कला प्रकारांत विद्यार्थ्यांची बाजी; प्रथम, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकांची कमाई

लांजा/अरबाज नेवरेकर:-मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाने विविध कला प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. वक्तृत्व, कथाकथन, क्ले मॉडेलिंग, एकांकिका, पेंटिंग, कार्टूनिंग आणि कोलाज आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथे मुंबई विद्यापीठांतर्गत दक्षिण रत्नागिरी विभागातील ५९ वा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात दक्षिण रत्नागिरी विभागातील १४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील कुरुप होते. यावेळी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी महेश सप्रे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील, राजेश शेट्ये, संजय तेंडुलकर आणि राजू धावणे आदी उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत अथर्व पाध्ये याने प्रथम क्रमांक मिळविला, तर कथाकथन स्पर्धेत सोनाली कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला. क्ले मॉडेलिंगमध्ये विशाल मसने याने प्रथम क्रमांक मिळविला. एकांकिका विभागात ‘मुकुट’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळविला.

हिंदी वक्तृत्व स्पर्धेत सानिया यादव हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. ऑन-द-स्पॉट पेंटिंग तसेच कार्टूनिंगमध्ये विशाल मसने याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. कोलाज स्पर्धेत ऐशिका ठकराल हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे विशाल मसने याने ललित कला विभागातील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विशेष लक्ष वेधून घेतले.

युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विक्रांत बेर्डे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राहुल मराठे, सांस्कृतिक समितीचे सदस्य प्रा. डॉ. राजेंद्र शेवडे, प्रा. प्रदीप कदम, पूर्वा गव्हाणकर आणि प्रा. विशाखा पावसकर यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना समितीच्या ७० स्वयंसेवकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनीही महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Total Visitors :
4674120
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *