कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या तत्परतेचे कौतुक
लांजा : येथील साटवली रोडवर हरवलेला मोबाईल शोधून देत लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत असून, साने गुरुजी विचार मंचाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कोकण प्रांतात परिचित असलेले माजी जनता दलाचे अध्यक्ष सुनील उर्फ नाना मानकर हे १२ ऑगस्ट रोजी सकाळी स्कूटरवरून साटवली रोडने कोत्रेवाडीच्या दिशेने खासगी कामासाठी जात होते. शिंदे यांच्या दुकानाजवळील स्पीड ब्रेकरवरून जाताना त्यांच्या खिशातील मोबाईल रस्त्यात पडला. मात्र, मोबाईल हरवल्याचे त्यांना घरी आल्यानंतर लक्षात आले.
यानंतर त्यांनी सुधाकर कांबळे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल हरवल्याची माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार दोघांनी लांजा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच बगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक सूचना देत मोबाईलचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली. काही तासांतच मोबाईल सापडल्याची माहिती त्यांनी संबंधितांना दिली. त्यानंतर सायंकाळी पोलीस ठाण्यात मोबाईल परत करण्यात आला.
हरवलेली वस्तू शोधून ती संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे यावेळी कौतुक करण्यात आले. तसेच, या प्रकरणातील गोपनीय माहिती सार्वजनिक न करता कार्यालयीन गोपनीयता जपल्याबद्दलही बगळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा, अभ्यासू वृत्ती, सचोटी आणि कार्यतत्परतेने काम करणारे अधिकारी म्हणून निळकंठ बगळे यांचे कौतुक होत आहे. साने गुरुजी विचार मंचाचे सचिव सुधाकर कांबळे यांनी मंचाच्या वतीने बगळे यांचे आभार मानत अभिनंदन केले.






