चिपळूण : तालुक्यातील पोफळी येथील छत्रपती शिवाजीराजे शासकीय निमशासकीय सहकारी पतसंस्थेत सभासद व ठेवीदारांच्या तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार व गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या अध्यक्षांसह पदाधिकारी, सदस्य आणि लिपिक अशा एकूण दहा जणांविरोधात अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०१९ ते १२ मे २०२६ या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारी सचिव, सदस्य तसेच लिपिक म्हणून कार्यरत असताना आरोपींनी सभासदांना कर्जाच्या स्वरूपात रक्कम दिल्याचे कागदोपत्री दाखविले. मात्र, प्रत्यक्षात संबंधित कर्जदार सभासदांना रक्कम न देता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच ठेवीदारांकडून ठेवीच्या स्वरूपात रक्कम स्वीकारल्यानंतर मुदत पूर्ण झाल्यावरही ती रक्कम ठेवीदारांना परत न करता गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे सभासद व ठेवीदारांच्या रोख रकमेपैकी एकूण ७४ लाख २७ हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी रत्नागिरी येथील वैभव रामचंद्र ठसाळे (वय ४४, व्यवसाय सरकारी नोकरी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अलोरे-शिरगाव पोलिसांनी अध्यक्ष संतोष गणपत घाडगे, उपाध्यक्ष बाबुराव दत्तात्रय शिंदे, सचिव अशोक कृष्णराव पाटणकर, कार्यकारी सचिव सूर्यकांत चंद्रकांत शिंदे, सदस्य संजय हरी देवरुखकर, शिवाजी पांडुरंग महाडीक, संतोष शांताराम सावंत, चंद्रकांत किसन भोसले, धनंजय श्रीरंग माने तसेच लिपिक वर्षा संतोष शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील सदस्य धनंजय श्रीरंग माने यांचे १४ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(२), ३१८(३), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ६१(२), ३(५), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४६, १४७ तसेच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा १९९९ मधील कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१ आणि १२०(ब) अनुषंगानेही आरोप नमूद करण्यात आले आहेत.
अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.५७ वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली. तब्बल ७४ लाख २७ हजार रुपयांच्या कथित अपहाराच्या या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संस्थेतील व्यवहार, कर्जवाटपाची कागदपत्रे, ठेवीदारांच्या नोंदी आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
चिपळूण: पोफळीतील सहकारी पतसंस्थेत ७४.२७ लाखांचा गैरव्यवहार; अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा
Leave a Comment






