पाचल येथील आझाद टेकडीवरील स्वातंत्र्यदिनाची ८० वर्षांची ऐतिहासिक  अखंड परंपरा आजही कायम

Gramin Varta
93 Views

पाचल/तुषार पाचलकर: भारताच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असताना राजापूर तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक आझाद टेकडीवर स्वातंत्र्यदिनाची ८० वर्षांची गौरवशाली परंपरा आजही अभिमानाने सुरू आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणापासून जपली गेलेली ही परंपरा पाचलवासीयांसाठी केवळ राष्ट्रभक्तीचा सोहळा नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशप्रेमाची जिवंत आठवण ठरली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वसंध्येला, म्हणजेच रात्री १२ वाजता, राजापूर पूर्व भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी पाचल येथील याच ऐतिहासिक आझाद टेकडीवर तिरंगा फडकावून भारतीय स्वातंत्र्याला अभिवादन केले होते. स्वातंत्र्यप्राप्तीचा तो ऐतिहासिक क्षण आझाद टेकडीवर साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहणाची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

या ऐतिहासिक परंपरेच्या जडणघडणीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गो. बा. तथा आबा नारकर, पु. ल. तथा आण्णा वायकुळ, आण्णा लब्दे, आण्णा रेडीज, बाबा मलूष्ठे, नामदेव भिंगार्डे, केशव नारकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या त्यागातून आणि सहकार्याने स्वातंत्र्याच्या पहाटे आझाद टेकडीवर फडकलेला तिरंगा आजही पाचलच्या इतिहासाचा साक्षीदार ठरला आहे.

दरवर्षी १५ ऑगस्टला पाचल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही परंपरा जपली जाते. सर्वप्रथम पाचल ग्रामपंचायत इमारतीलगतच्या दीक्षाभूमी येथे ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, खासगी शाळा, अंगणवाड्या तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात. यानंतर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी पाचलच्या मुख्य रस्त्याने आणि बाजारपेठेतून ऐतिहासिक आझाद टेकडीकडे नेली जाते.

आझाद टेकडीवर पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले जाते. पाचल गावचे प्रथम नागरिक यांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जाते.

आज आठ दशकांनंतरही आझाद टेकडीवर अभिमानाने फडकणारा तिरंगा पाचलच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची साक्ष देत आहे. स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या पहाटे स्वातंत्र्यसैनिकांनी ज्या ठिकाणी तिरंगा फडकावून स्वतंत्र भारताला अभिवादन केले, त्याच ठिकाणी आजची पिढी राष्ट्रध्वजाला सलामी देत आहे. त्यामुळे आझाद टेकडीवरील हा ध्वज केवळ राष्ट्रध्वज नसून स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, देशप्रेम आणि पाचलच्या ऐतिहासिक वारशाची अखंड परंपरा जपणारे प्रेरणास्थान बनले आहे.

Total Visitors :
4703874
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *