रत्नागिरी : कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी रत्नागिरी येथे “कुणबी विद्यार्थी गुणगौरव सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, साळवी स्टॉप येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरी, कुणबी कर्मचारी सेवा संघ रत्नागिरी, लोकनेते श्यामरावजी पेजे स्मृती ट्रस्ट आणि कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यासाचे अध्यक्ष सुजित झिमण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
यावेळी शिरगाव येथील केंद्रप्रमुख अमर घाडगे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष रामभाऊ गराटे, कुणबी कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष संतोष रावणंग, कुणबी समाज क्रांती संस्था रत्नागिरीचे अध्यक्ष सलील डाफळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई रत्नागिरी शाखा अध्यक्ष सूर्यकांत गोताड, महिला अध्यक्ष सौ. विनय गावडे, कुणबी युवा अध्यक्ष ऍड. सागर कळंबटे, ऍड. महेंद्र मांडवकर यांनीही मार्गदर्शनपर भाषणे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन दिशा मिळाली.
या सोहळ्यात इयत्ता १०वी, १२वी, तसेच शिष्यवृत्ती, नवोदय, NMMS, CET परीक्षांसह कला, क्रीडा आणि उद्योजकता क्षेत्रात यश मिळवलेल्या सुमारे ३२५ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना फोल्डर, प्रमाणपत्र, शाल आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बैकर, संतोष भुवड, श्री. आरेकर, सुभाष पालये, अजय गावडे आणि जितेंद्र थराडे यांनी केले. दिगंबर घवाळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचारांचे वाटप करून अल्पोपहाराचे आयोजनही करण्यात आले होते.
कुणबी समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला
