रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएम फोडून रोकड लुटण्याचा अज्ञात चोरट्याने प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी पहाटे २.५३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या इमारतीमध्ये असलेल्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून ते फोडण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास बँकेतील सहकाऱ्याने शाखा व्यवस्थापक शीतल रमाकांत शिंदे यांना फोन करून एटीएम मशीन कोणीतरी फोडल्याची माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ बँकेत जाऊन पाहणी केली असता एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी शाखा व्यवस्थापक शीतल शिंदे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३४(१), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून, एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर बाबींच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





