गणेशोत्सवात अणूस्कुरा घाटातून अवजड वाहतूक बंद करा; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नागरिकांची जोरदार मागणी

Gramin Varta
40 Views

राजापूर : अणूस्कुरा घाटातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घाटमार्गातून अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. घाटातील अवघड वळणावर १४ चाकी अवजड ट्रक बंद पडून २४ तासांहून अधिक कालावधी उलटला तरी तो पूर्णपणे हटविता न आल्याने वाहतूक सुरळीत करण्याच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणूस्कुरा घाटातील एका अवघड वळणावर अवजड ट्रक अचानक बंद पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अणूस्कुरा चेकपोस्टवरील यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. ट्रक बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र, वळणाचा अरुंद भाग आणि ट्रकची स्थिती यामुळे तो पूर्णपणे हटविणे शक्य झाले नाही.

वाहतुकीचा अडथळा कमी करण्यासाठी ट्रक रस्त्याच्या एका बाजूला सरकविण्यात आला आणि त्याच्या बाजूने सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या परिस्थितीत लहान चारचाकी आणि दुचाकी वाहनांना कसाबसा मार्ग उपलब्ध झाला; मात्र मोठ्या वाहनांना पुढे जाण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर ट्रक आणखी बाजूला करण्यात आल्याने दोन्ही दिशेची वाहतूक सुरू झाली असली, तरी रस्त्याच्या कडेला ट्रक असल्याने घाटातील वाहतूक अद्याप अपेक्षित प्रमाणात सुरक्षित आणि सुरळीत झालेली नाही.

दरम्यान, आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद असल्याने त्याचा परिणाम अणूस्कुरा घाटावर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आंबा घाटातून वळविण्यात आलेली अवजड वाहने अणूस्कुरा मार्गाचा वापर करीत असून, यामध्ये लाकूड वाहतूक करणारे ट्रक, गॅस सिलिंडरची वाहने, पेट्रोल-डिझेल टँकर तसेच अन्य मोठ्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे आधीच अरुंद आणि वळणावळणाच्या असलेल्या घाटमार्गावर वाहनांचा ताण वाढला आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे रवाना होतात. या काळात अणूस्कुरा घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहने आणि प्रवासी वाहनांची मोठी गर्दी एकाच वेळी झाल्यास वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अणूस्कुरा घाटात दरडी कोसळणे, मोठे दगड रस्त्यावर येणे तसेच अवजड वाहने बंद पडून वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. घाटात एखादे वाहन बंद पडल्यास ते तातडीने हटविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन करावे, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवातील वाढता प्रवासी भार आणि अणूस्कुरा घाटाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता, उत्सवकाळात या मार्गावर अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Total Visitors :
4767628
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *