रत्नागिरी: ‘सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा…’ या पारंपरिक कोळीगीतांच्या तालावर ठेका धरत, अथांग सागराला श्रीफळ अर्पण करून रत्नागिरीतील सागरपुत्रांनी आज नारळी पौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरी केली. पावसाळ्यातील उधाणलेला समुद्र शांत व्हावा आणि नव्या हंगामात जाळ्यात मुबलक मासळी मिळावी, अशी आर्त साद घालत खारवी आणि भंडारी बांधवांनी समुद्राची विधीवत पूजा केली.
रत्नागिरी शहर आणि परिसरातील मांडवी बीच, भाट्ये, पांढरा समुद्र आणि भगवती बंदर या प्रमुख सागरतीर्थांवर आज सकाळपासूनच भाविक व कोळी बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि ‘बा देवा समुद्रा शांत हो’ असा जयघोष करत सागराला सोन्याचा व चांदीचा मुलामा असलेले तसेच साधे श्रीफळ अर्पण करण्यात आले.
या उत्सवात शासकीय यंत्रणांनीही आपली परंपरा कायम राखली. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयापासून मांडवी किनाऱ्यापर्यंत श्रीफळाची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आले. तसेच रत्नागिरी सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या वतीनेही समुद्राचे पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. दुसरीकडे, रत्नदुर्गवासिनी श्रीदेवी भगवती मंदिरातून मानाचे श्रीफळ ढोल-ताशांच्या गजरात भगवती बंदरावर आणून विधीवत पूजन करत सागराच्या स्वाधीन करण्यात आले.
ग्रामीण भागातही या उत्सवाचा मोठा उत्साह दिसून आला. रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे येथे खारवी बांधवांनी श्रीफळाची भव्य सोनेरी देखणी प्रतिकृती तयार करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. पारंपरिक कोळीनृत्य करत ही मिरवणूक समुद्रकिनाऱ्यावर पोहोचली आणि भक्तिभावाने श्रीफळ अर्पण करण्यात आले. रत्नागिरी शहर आणि समुद्रकिनारपट्टीवरील गावांमध्ये दिवसभर नारळी पौर्णिमेचा जल्लोष सुरू होता. सागराला नारळ अर्पण केल्यानंतर आता मच्छीमारांच्या नौका नव्या हंगामासाठी सागरात झेपावण्यास सज्ज झाल्या आहेत.




