पुण्यातील वारजे माळवाडीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना; मुलाच्या हत्येप्रकरणी आई-वडिलांना अटक
पुणे : श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण बनवण्याच्या हट्टावरून झालेल्या वादाने एका कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त झाला. दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मटण शिजवून देण्याचा हट्ट धरल्याने संतापलेल्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, पतीने केलेल्या मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आईने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील रामनगर येथे २४ ऑगस्टच्या रात्री ही हृदयद्रावक घटना घडली.
या घटनेत महेश भागवत गायकवाड (वय ३०) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) या त्याच्या आई-वडिलांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
दारूच्या नशेत घरी आला अन् मटणाचा हट्ट धरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्याने तसेच तो कोणतेही काम करत नसल्याने त्याच्या वैवाहिक आयुष्यात वाद निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच त्याचा घटस्फोट झाला होता. त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती.
महेश एकटाच राहत होता. जेवणासाठी तो शेजारी राहणाऱ्या आई-वडिलांकडे जात असे. दारूच्या नशेत घरी आल्यानंतर मांसाहारी जेवणाची मागणी करणे ही त्याची सवय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
२४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला. त्याने आई-वडिलांकडे मटणाचे कालवण करून देण्याचा हट्ट धरला. मात्र, श्रावण महिना सुरू असल्याने घरात मांसाहार केला जाणार नाही, असे आई-वडिलांनी सांगितले. यावरून महेशने वाद घातला.
शब्दांचा वाद क्षणात रक्तरंजित झाला
मटणाच्या मागणीवरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक झाला. संतापलेल्या भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर जोरदार मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेशचा जागीच मृत्यू झाला.
मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना न देता आई पार्वतीने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. तिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
भावाने दिली फिर्याद; अखेर आई-वडील पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महेशच्या मोठ्या भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू करून भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक केली.
मुलाच्या हत्येप्रकरणी वडिलांविरोधात, तर घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आईविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.
एका क्षणाचा संताप, दारूचे व्यसन आणि मटणाच्या हट्टावरून पेटलेला वाद… या सगळ्याचा शेवट अखेर एका कुटुंबाच्या लेकराच्या मृत्यूत झाला. पुण्यातील या घटनेने कौटुंबिक वाद किती भयंकर वळण घेऊ शकतो, याची काळीज पिळवटून टाकणारी जाणीव पुन्हा एकदा करून दिली आहे.
मटणाच्या हट्टाने संपलं लेकराचं आयुष्य! श्रावणात जेवणावरून वडिलांचा संताप अनावर; मुलाला बेदम मारहाणीत मृत्यू, आईने रक्ताचे डाग पुसून पुरावे मिटवले
Leave a Comment





