GRAMIN SEARCH BANNER

गुहागर आगारातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी 150 गाड्यांचे बुकिंग

गुहागर : गणेशोत्सवासाठी गुहागर आगारातून जास्तीत जास्त चाकरमान्यांना एसटी महामंडळाची सेवा दिली जात असून आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. तर येणाऱ्या फेऱ्या धरून यावर्षी 500 गाड्यांचे उद्दिष्ट गाठणार असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळाचे गुहागर आगार सज्ज राहिले आहे. मुंबई व पुणे या भागातून तब्बल अडीचशे ते पावणेतीनशे गाड्या गुहागर तालुक्यात येण्याचे नियोजन झाले आहे. तर गुहागर तालुक्यातून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 150 गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये 50 गाड्या ऑनलाईन तर 100 गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.

2 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास होणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होईल. मुंबई, बोरीवली, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड अशा एस. टी. फेऱ्या आहेत. नालासोपारा येथील चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी वाहन मिळावे याकरिता गुहागर आगारातील वाहतूक नियंत्रक नालासोपारा डेपोमध्ये पाठविण्यात आले असून त्यांच्या मार्फतही परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग घेतले जात आहे.

त्याचबरोबर 27 ऑगस्टपासून गुहागर आगारातून बोरीवली व पिंपरी-चिंचवड अशा दोन जादा एस. टी. फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरीता शिवशाही वाहतूक करणार आहे. ग्रुप बुकिंग व्यतिरिक्त दररोज सकाळी व सायंकाळी मुंबई, भांडूप, नालासोपारा, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

गुहागर आगारात दाखल होणाऱ्या वाहनांना गुहागर आगार व पोलिस परेड मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील साईट पट्टी खोदाई झाल्याने शृंगारतळी येथे पार्किंगसाठी खासगी जागा घेतली जाणार आहे. येणाऱ्या चालक-वाहकांची शहरातील भंडारी भवन सभागृहात राहण्याची व्यवस्था केली जात असून याबाबत सभागृह चालकांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुहागर आगारात केवळ 64 एस. टी. गाड्या असून नियमित फेऱ्या कायम ठेवून बाहेरून येणाऱ्या गाड्यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना परतीची सेवा दिली जाणार आहे.

Total Visitor Counter

2474947
Share This Article