रत्नागिरी (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सागरी जलक्षेत्रात अर्थात १२ सागरी मैल (नॉटीकल मैल) अंतरापर्यंत पर्ससीन अथवा मिनी पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी असतानाही, या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या ४ मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने धडक कारवाई केली आहे. काळबादेवी समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या ४ ते ५ नॉटीकल मैल अंतरावर राजरोसपणे मासेमारी करत असताना या नौकांना रंगेहात पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या नौकांमध्ये मिरकरवाडा परिसरातील ३ आणि काळबादेवी येथील एका नौकेचा समावेश आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर आणि दंडात्मक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांनी दिला आहे.
१ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असली, तरी राज्य सागरी हद्दीत अशा प्रकारच्या मासेमारीला कायदेशीर परवाना नाही. जिल्ह्यातील सुमारे ३०५ पर्ससीन नौकांना केवळ १२ सागरी मैलाबाहेरील खुल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी ‘ॲक्सेस पास’ देण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक नौका राज्याच्या हद्दीत घुसखोरी करून पारंपरिक मच्छिमारांच्या हक्कावर गदा आणत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने समुद्रात गस्त तीव्र केली होती.
सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक ‘शारदा’ या गस्ती नौकेवरून काळबादेवी समुद्रात टेहळणी करत असताना, किनाऱ्यालगतच ४ मिनी पर्ससीन नौका बेकायदेशीर जाळी टाकून मासेमारी करताना निदर्शनास आल्या. पथकाने तातडीने कारवाई करत मिरकरवाडा येथील सर्फराज नजीर पावसकर यांची ‘रिया-सारिया’, अस्लम हसन दर्वे यांची ‘उबेदुल्ला अदनान’, मुस्सदीक अब्दुल हमीद जयगडकर यांची ‘आयरा झैनाब’ आणि काळबादेवी येथील धनंजय बिर्जे यांची ‘ध्रुवी’ या चारही नौका ताब्यात घेतल्या. शासनाचे नियम धाब्यावर बसवून तडीवरच मासेमारी करणाऱ्या या नौकांवर आता नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






