खाद्यतेलाचे दर 20 ते 30 रुपयांनी वाढले; घरच्या फोडणीला तडका

Gramin Varta
116 Views

रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडला आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढली असतानाच पुरवठ्यात घट झाल्याने किरकोळ बाजारात तेलाचे दर प्रतिलिटर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत.

गेल्या महिन्याच्या तुलनेत करडी आणि शेंगदाणा तेलाच्या दरात प्रतिकिलो सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी इतर खाद्यतेलांच्या दरातील वाढ कायम असल्याने त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. गेल्या वर्षी याच दिवसांत खाद्यतेलाचे दर ११५ रुपयांच्या घरात होते. मात्र, यंदा दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे घरगुती आर्थिक गणित बिघडले आहे.

खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने बाजारातील मागणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवाढ रोखण्यासाठी सरकारने निर्बंध लागू करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान, देशांतर्गत खाद्यतेलाचा पुरवठा घटल्यानेही दरवाढीला हातभार लागला आहे. गेल्या काही काळात तेलबियांचे उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम झाल्याने तेल कारखान्यांना पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत उपलब्धतेवर परिणाम झाला असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वाढत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सूर्यफूल, सोयाबीन, पामतेल, शेंगदाणा, करडी आणि सरकी या खाद्यतेलांच्या दरात वाढ झाल्याचे बाजारातील चित्र आहे. गणेशोत्सवाच्या काळात तेलाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दरवाढीचा फटका ग्राहकांना किती काळ सहन करावा लागणार, याकडे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4820392
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *