राजापूर : धावत्या एसटी बसमध्ये देवदूत ठरल्या महिला नायब तहसीलदार

Gramin Varta
146 Views

दीपाली पंडित यांच्या प्रसंगावधानाने आणि वेळेवर सीपीआर दिल्याने वाचले बेशुद्ध मुलीचे प्राण

राजापूर (प्रतिनिधी) : रत्नागिरीहून सावंतवाडीच्या दिशेने निघालेल्या धावत्या एसटी बसमध्ये अचानक बेशुद्ध पडलेल्या एका तरुणीसाठी सहप्रवासी असलेल्या महिला नायब तहसीलदार दीपाली पंडित या देवदूत ठरल्या आहेत. प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि जागेचा अभाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीत दाखवलेले प्रसंगावधान आणि तातडीने दिलेला सीपीआर (CPR) यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले.

राजापूरच्या मूळ रहिवासी आणि सध्या कणकवली येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली पंडित या सोमवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजता नियमितपणे राजापूर येथून कणकवलीकडे जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसल्या होत्या. गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस नांदगाव थांब्यावरून पुढे जात असताना अचानक मागील सीटवरून एका आईचा हताश आक्रोश ऐकू येऊ लागला. ‘अगं उठ ना, उठ ना’ असे म्हणत ती असहाय्य आई आपल्या बेशुद्ध पडलेल्या मुलीच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. सुरुवातीला ती गाढ झोपेत असावी असा प्रवाशांचा समज झाला; मात्र गाडी हुंबरट थांब्यादरम्यान आल्यावर बस कंडक्टरच्या चेहऱ्यावरील चिंता आणि त्याची वारंवार मागे होणारी धावपळ पाहून दीपाली पंडित यांनी तात्काळ चौकशी केली. मुलगी पूर्णपणे बेशुद्ध पडल्याचे समजताच त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता गर्दीतून वाट काढत थेट मागच्या सीटवर धाव घेतली.

मुलीची गंभीर आणि मूर्च्छितावस्था पाहून कोणतीही वैद्यकीय मदत तिथे उपलब्ध नसताना दीपाली पंडित यांनी तिला तातडीने आसनावर आडवे केले आणि स्वतः तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. बसमधील अरुंद जागा आणि प्रवाशांची गर्दी यांमुळे उभे राहून सीपीआर देणे अत्यंत आव्हानात्मक होते; तरीही त्यांनी पूर्ण ताकदीने मुलीच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आणि चौथ्या-पाचव्या कॉम्प्रेशनला मुलीने प्रतिसाद देत डोळे उघडले.

- Advertisement -

मुलगी शुद्धीवर येताच भयभीत झालेल्या तिच्या आईसह बसमधील सर्वच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला, तर चालक-वाहकांनीही मोठा दिलासा व्यक्त केला. हुंबरट येथे जवळच रुग्णालय असल्याने पुढील उपचारांसाठी त्या मायलेकींना पुढच्या थांब्यावर उतरवून रुग्णालयात हलवण्यात आले. अशा आणीबाणीच्या क्षणी सीपीआर कसा द्यावा याची माहिती प्रत्येकाला असणे अत्यंत आवश्यक असून, आरोग्य विभागामार्फत याबाबत जनजागृती केली जावी; तसेच एसटी प्रशासनाने चालक-वाहकांनाही अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे मत या घटनेनंतर नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी व्यक्त केले.

Total Visitors :
4826580
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *