दाभोळे/सिकंदर फरास: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संपूर्ण परिसरात बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाभोळे बेलकरवाडी येथे बाप्पाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार जोमाने कामाला लागले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून हे गणेशोत्सवाचे काम सुरू असून सध्या मूर्तींच्या देखण्या रंगरंगोटीचे काम अतिशय एकाग्रतेने सुरू आहे.बाप्पाची मूर्ती अधिक सुंदर देखणी व आकर्षक दिसावी यासाठी येथील मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत आहेत. मूर्तींची रंगरंगोटी हे अतिशय नाजूक आणि जबाबदारी असणारे काम असल्याने यात वेळ हा जातो.
बेलकरवाडी येथे यंदा सुमारे १५० लहान-मोठ्या आकर्षक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे येथील बाप्पाच्या मूर्तींना केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर दूरदूरवरून मोठी मागणी असते अशी माहिती मूर्तिकार शुभम महादेव बेलकर यांनी दिली.
प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर येथील मूर्तींवरील प्रत्येक नक्षीकाम अतिशय बारकाईने व वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने केल्याचे दिसून आले. एक-एक मूर्ती पाहताना मनाला एक वेगळाच आनंद व प्रसन्नता मिळाली आहे. बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी मूर्ती बनवण्याचे हे पारंपरिक काम आवडीने जोपासले जात आहे. या संपूर्ण निर्मितीच्या कामात श्रीराम धोंडू बेलकर, शुभम महादेव बेलकर, शंकर अर्जुन पडयार, जयेश महादेव बेलकर आणि तुकाराम भिवा पडयार हे सर्व मूर्तिकार अत्यंत मन लावून आपले योगदान देत आहेत.
आतुरता बाप्पाच्या आगमनाची ; मूर्तिकार रंगरंगोटीच्या अंतिम टप्प्यात
Leave a Comment






