रत्नागिरी: वाढदिवसाला तलवारीने केक कापून व्हिडीओ व्हायरल; मिरजोळेतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
678 Views

रत्नागिरी : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मानवी जीवितास किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होईल, तसेच दहशतीचे वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे, पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीने आपल्या वाढदिवसानिमित्त मिरजोळे पाटीलवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांना व्हॉट्सअॅपवर आरोपीने तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. या कृत्यामुळे मानवी जीवितास किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवारीचा वापर करून केक कापल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद बाबल्या कांबळे (वय ३८, नेमणूक रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.२५ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४६/२०२६ दाखल करण्यात आला.

- Advertisement -

आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) चा भंग केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4849284
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *