रत्नागिरी पालिकेचा मनमानी कारभार: रहदारीच्या वेळी सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

Gramin Varta
70 Views

रत्नागिरी: पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा स्पष्ट नियम असतानाही, रत्नागिरी नगरपालिकेकडून ऐन पावसाळ्याच्या दिवसात शहरात विकासकामांचा धडाका सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा गैरफायदा घेत प्रशासनाकडून सुरू असलेल्या या अवेळी कामांमुळे आता सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. भर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य केंद्र असलेल्या जेल रोड नाका येथे या रस्ते कामाचा मुहूर्त साधण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, शहराच्या या मुख्य रस्त्याचा एक भाग ऐन वर्दळीच्या वेळी अचानक बंद केल्याने चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून भीषण वाहतूक कोंडी झाली. भर दुपारी कडक उन्हात वाहनचालक तासनतास अडकून पडल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. दुपारची वेळ ही प्रामुख्याने शाळा-महाविद्यालये सुटण्याची असल्याने या ट्रॅफिक जाममध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते.

नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या हिताचे काम करत असल्याचा दावा करते, पण त्यांची प्रत्यक्ष कृती मात्र अत्यंत असंवेदनशील आहे, अशा तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. ‘आम्ही विकास कामे करतोय, मग काहीही करणार’ अशा अविर्भावात नगरपरिषद प्रशासन वागत असल्याचा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते खोदाई आणि विविध कामांचे नियोजन करताना सर्वसामान्य नागरिकांच्या सोयींचा आणि वेळेचा विचार का केला जात नाही, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पालिकेच्या या मनमानी कारभारावर आता नक्की अंकुश कोण ठेवणार आणि त्रस्त नागरिकांच्या समस्यांची दखल कोण घेणार, हा खरा प्रश्न असून या ढिसाळ नियोजनामुळे रत्नागिरीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *