फुणगूस ग्रामपंचायतीच्या बंदी आदेशाला केराची टोपली; परप्रांतीय फेरीवाल्यांची गावात पुन्हा वर्दळ

Gramin Varta
306 Views

संगमेश्वर/एजाज पटेल: फुणगूस परिसरात बाहेरील अज्ञात फेरीवाल्यांकडून होणारी फसवणूक आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गावात फेरीवाले व भंगारवाल्यांना बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या या आदेशाला सध्या संबंधितांकडून केराची टोपली दाखवली जात असून, बंदी असतानाही परप्रांतीय फेरीवाले आणि भंगारवाले गावात बिंधास्तपणे वावरत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लावलेले फलकही आता गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काही महिन्यांपूर्वी ग्रामसभेत महिला आणि जागरूक नागरिकांनी दुर्गम वाड्या-वस्त्यांवर फिरणाऱ्या बाहेरील विक्रेत्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याकडे लक्ष वेधले होते. लोकभावनेचा आदर करत ग्रामपंचायत प्रशासनाने गावात विनापरवाना कोणत्याही फेरीवाल्याला फिरण्यास बंदी घातली होती आणि याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावले होते. सुरुवातीच्या काळात काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यानंतर हे विक्रेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, ही मंडळी कोणाच्या आशीर्वादाने पुन्हा गावात आली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हा केवळ नियमभंग नसून, जनतेच्या करातून उभारलेल्या फलकांचीही ही एकप्रकारे अवहेलना आहे. जर ही यंत्रणा जनतेच्या सुरक्षिततेसाठी गांभीर्याने काम करत असेल, तर हे फलक गायब कसे झाले आणि फेरीवाल्यांना मोकळे रान कोणी दिले, याचा हिशोब आता ग्रामस्थ विचारत आहेत. या प्रकारामुळे वाडीवस्तीवरील महिला आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचा वचक संपल्याच्या भावना व्यक्त होत असून, ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष देऊन गायब फलक पुन्हा लाववेत आणि विनापरवाना फिरणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी फुणगूसवासियांनी केली आहे.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *