खेडशी अपघात प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
34 Views

रत्नागिरी: हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून, निष्काळजीपणे डंपर चालवणाऱ्या चालकावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जून रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रमोद पांचाळ हे आपली पत्नी प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७, रा. खालगाव, जाकादेवी) यांना स्कूटरवरून (एम.एच.०८.ए.डब्ल्यु ०५६६) घेऊन जात होते. खेडशी नाक्यावरील सुयोग मँगो दुकानासमोर आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एम.एच.०८.बी.के.४०९९) त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूटरवरून खाली पडल्याने प्रांजल पांचाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रज्वल पांचाळ हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डंपर चालक राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी रत्नागिरी, मूळ रा. मध्यप्रदेश) याने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवून हा अपघात घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि पथकाने चालक राजेश विश्वकर्मा याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4576952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *