लांजात गवा रेड्याकडून रोपवाटिकांचे नुकसान, शेतकरी हैराण

Gramin Varta
214 Views

लांजा/ फरहान पाटणकर : तालुक्यात गव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून अनेक ठिकाणी बागायती आणि रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील झापडे येथे नुकतेच गव्यांच्या कळपाने घातलेल्या धुमाकूळामुळे हजारो खैर रोपांची नासधूस झाली असून यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

मागील काही महिन्यांपासून लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गव्यांचे कळप काजू, आंबा तसेच इतर फळबागांमध्ये घुसून झाडांना अंग घासत असल्याने झाडांचे नुकसान होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत शेतकऱ्यां मधून चिंता व्यक्त केली जात आहे.

झापडे येथील शेतकरी मधुकर गोविंद पालये यांच्या शेतातील खैर रोपवाटिकेची गव्यांनी नासधूस केली. या घटनेत तब्बल हजारो खैर रोपे उद्ध्वस्त झाली आहेत. खैर रोपांना सध्या मोठी मागणी असताना झालेल्या या नुकसानीमुळे रोपांचा तुटवडा निर्माण झाला असून पालये यांना सुमारे दोन लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

दरम्यान, तालुक्यात गव्यांचा वाढता वावर आणि त्यातून होत असलेले पिकांचे व बागायतींचे नुकसान यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी तसेच गव्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Total Visitors :
4827550
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *