खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार आक्रमक

Gramin Varta
355 Views

गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

रत्नागिरी : पत्रकारांना शिविगाळ करत जाहीरपणे धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले.

आज मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर लोकप्रतिनिधींकडून होणारे असे हल्ले अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेत, अशी तीव्र भावना या वेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पत्रकार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे अपेक्षित असताना, उलट त्यांच्याकडूनच पत्रकारांना अशा प्रकारे धमकावणे अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रवृत्तींना वेळीच चाप बसवणे गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेने आक्रमक भूमिका घेत रत्नागिरी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या या निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये कोणतीही हयगय न करता कडक पावले उचलली जावीत, असा आग्रह पत्रकारांनी धरला आहे. पोलीस अधीक्षकांनीही या निवेदिनाची गांभीर्याने दखल घेतली असून, या प्रकरणाची योग्य ती शहानिशा करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या वेळी जिल्ह्यातील अनेक  पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4828027
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *