चिपळूणमध्ये रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरणाऱ्या तिघांवर कारवाई; पोलीस दलाची धडक मोहीम

Gramin Varta
426 Views

चिपळूण: चिपळूण शहराच्या विविध भागांत मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद रित्या फिरणाऱ्या आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या तिघा तरुणांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूर्योदयापूर्वीच्या गडद अंधाराचा फायदा घेऊन तोंडाला कापड बांधून संशयास्पद हालचाली करणाऱ्या या तिघांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राबवण्यात येत असलेल्या गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी मध्यरात्री १.०० च्या सुमारास रामतीर्थ परिसरात रोहित नरसिंग राठोड (वय २०) हा एका टपरीच्या आडोशाला संशयास्पद स्थितीत मिळून आला.

त्यानंतर पहाटे ३.३० च्या सुमारास फरशी तिठा येथे सचिन बाबू चव्हाण (वय २६) आणि खेर्डी देऊळवाडी परिसरात राहुल धनाजी चव्हाण (वय २२) हे दोघेही तोंडाला कापड बांधून संशयास्पद स्थितीत फिरताना पोलिसांना आढळले.

या तिन्ही ठिकाणी संबंधित पोलीस अंमलदारांनी त्यांना हटकले असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे लोक स्वतःची ओळख लपवून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.

सहायक पोलीस फौजदार अजय शिंदे, पोलीस नाईक रुपेश जोगी आणि पोलीस हवालदार निलेश धांगडे यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर पोलीस आता अधिक कडक लक्ष ठेवून असून, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4577011
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *