मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या विवंचनेतून बेपत्ता झालेल्या परचुरीतील महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळला

Gramin Varta
1149 Views

संगमेश्वर: मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून परचुरी येथून बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीपात्रात आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सौ. अंजनी अर्जुन वेद्रे (वय ५४, रा. परचुरी वेद्रेवाडी) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परचुरी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या लग्नाची चिंता आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव यामुळे सौ. अंजनी वेद्रे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होत्या. याच विवंचनेत त्यांनी २६ जून रोजी दुपारी कोणालाही काहीही न सांगता घर सोडले होते. पती अर्जुन यशवंत वेद्रे आणि नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या मिळून न आल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, डिंगणी हद्दीतील खाडीपात्रात काठालगत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिथे धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटली असून, तो सौ. अंजनी वेद्रे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रीतसर पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4828037
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *