देवरुखमध्ये करांमधील अवाजवी वाढीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; ६ जुलैला नगर पंचायतीला जाब विचारणार

Gramin Varta
126 Views

देवरुख : नगर पंचायत प्रशासनाने केलेल्या अवाजवी कर वाढीविरोधात ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने करांमध्ये थेट चौपट वाढ केल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली असून, या अन्यायाविरोधात येत्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्व ग्रामस्थ नगर परिषदेवर एकत्र येऊन प्रशासनाला थेट जाब विचारणार आहेत.

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामस्थांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी शिक्षण, आरोग्य आणि अनपेक्षितपणे लावण्यात आलेल्या ‘वृक्ष करा’वरून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. सर्वसामान्यांकडून ‘वृक्ष कर’ कसला वसूल केला जातोय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता कर थेट चौपट का वाढवला, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उपस्थित केला. नगर पंचायत हद्दीतील ७० टक्के ग्रामीण आणि ३० टक्के शहरी भागातील पायाभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, केवळ करवसुलीचा तगादा लावला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकशाही मार्गाने नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद सदस्य नेहा माने, नगरसेवक बाळा कामेरकर आणि सुरेश बने यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आणि प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी निधा कापडी, ऋतुजा कदम, युयुत्सु आर्ते, बंड्या बोरुकर, छोट्या गावणकर, दिलीप बोथले, प्रसाद सावंत, निखिल कोळवणकर, मनोहर गुरव, डॉ. मंगेश कांगणे, निलेश भुवड यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषदेवर धडक देण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आपल्या हक्कासाठी आणि अन्यायी कर वाढीविरोधात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827799
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *